सकाळीच गल्लीतून चक्कर मारून परतते.
वाटेत प्राजक्ताचा सडा पाहिलेला.
मेजापाशी थबकते.
सुचलेल्या दोन ओळी लिहीणार
तेवढ्यात पानंच सळसळतात.
ती वेध घेत तिथेच
थबकते.
काळ्याशार ओट्यावर
आकारा-आकारांची (आ-केलेली!) स्टीलची भांडी.
स्वतःत सामावलेली गिरकी घेत
एखादं आपटतं दुसऱ्यावर.
तिला हसू येतं.
उन्हं कलताना हळूहळू
कलतात आसपासचे आवाजही.
फळा पुसल्यासारखी निवळते
ढगाची सोनेरी-जांभळी किनार.
वाट दिसेनाशी होण्याआधी
ती टिपून घेते.
झाली सारी पांगापांग की ती स्तब्ध.
जीवाच्या अंगणात
साऱ्यांची मूक विचारपूस.
अंतःकरणातली लकेर
कधी निःश्वासातून, कधी हुंकारातून
कधी बिनभिंतींची खुली
सहज, सगळ्यांसाठी.
ती उमटते तेंव्हा
निःशब्दाला झळाळी येते.
उमज पांघरून
ती दिवस मालवते.

- आनंद
Comments